Tuesday 24 December 2013

Library/ ग्रंथालय/ वाचनालय!

 येथे आल्यापासून आणि वेगवेगळ्या गावांतील public library बघून बरेच दिवस यावर काही लिहावे असे मनात होते पण जमत नव्हते.   २३ डिसेंबर २०१३ ला  ''सकाळ " मध्ये "झोपडपट्टीतील मुलांसाठी फिरते ग्रंथालय" हा लेख वाचला आणि मग सगळे सुचत गेले. वाचनाचा छंद असलेल्या गरीब मुलांना तो जोपासता यावा म्हणून एका महाविद्यालयातील मुले हा अभिनव उपक्रम येत्या वर्षा पासून सुरु करीत आहेत. उत्तम कल्पना आहे. मुलांना मिळणारा आनंद आणि त्याचे फायदे मोजण्या पलीकडील आहेत.  हा उपक्रम एका विशिष्ट वर्गातील मुलांसाठी आहे. ठीक. आता मुद्दा आहे इतर वर्गातील मुलांचा.

 पूर्वी उन्हाळी सुट्टीत, दोन महिने मुलांना मस्त वेळ असायचा. फार तर आजोळी जाणे  पण कुठे ही असले तरी, वाचनालयाचे सभासद होणे आणि मन मुराद गोष्टीची पुस्तके वाचणे असे प्रघात असायचे. मग या पुस्तकांची अदलाबदल होणे हे ओघाने आलेच. पुस्तके विकत घेणे किंवा भेट मिळणे याला एक मर्यादा होती. आणि हो एकत्र कुटुंब पद्धती मध्ये कुठल्या तरी मोठ्याला वाचनाची आवड असायची आणि मग बच्चे कंपनी खूष. परत हि मोठी व्यक्ती घरात नाही तर शेजारी-पाजारी असायची. थोडक्यात जवळपासच्या सर्व मुलांचे कल्याण.

 आता चित्र खूप वेगळे आहे, उन्हाळी सुट्टी म्हणजे सहली आणि त्याहून वेळ मिळाला तर शिबिरे किंवा छंद वर्ग. पुस्तके विकत घेणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. मुद्दा असा कि आपण किती ही पुस्तके विकत घेतली तरी घरीच वाचनालय होवू शकते का? दुसरे आता बऱ्याच ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धत, मुलांना वेळ कोण देणार आणि वाचनाचे संस्कार कोण करणार. ढिगाने पुस्तके आणून दिली तरी ती वाचली जाणार याची खात्री काय? ती नुस्तीच शोभेसाठी किंवा status symbol साठी नाही हे कसे समजणार?

दोन उदाहरणे,

शाळेत कोणा एका इयत्तेत  असताना वर्ग शिक्षिका असणाऱ्या बाईंनी सांगितले  की डायरी म्हणजेच रोजनिशी लिहा. खूप फायदे ही सांगितले मग काय जो तो डायरी लिहू लागला.  बरे आठवड्या नंतर त्याच बाईंनी सर्वांना आपली रोजनिशी आणावयास सांगितली. झाले मग काय, ज्यांनी लिहिली नव्हती त्यांनी एका दिवसांत ती पूर्ण केली. मागे कोण राहणार.  गंमत म्हणजे सर्वांची रोजनिशी तशी सारखीच होती, साचेबद्ध (routine) आयुष्य असल्या मुळे त्यात नवीन असणार तरी काय होते. त्यात काही प्रमाणात वाक्ये ही सारखीच होती.

तशीच दुसरी एक आठवण शाळेत शिक्षिका असलेल्या मैत्रिणीने सांगितलेली. शाळेतील मुलांचे निबंध साधारण पण  सारखेच असतात. असे कसे? उत्तर सोपे आहे,  शाळा एकच आणि शाळे नंतर क्लास पण सारखेच.  बरे क्लास सारखे नसले तरी शिक्षक वापरणार ती पुस्तके सारखीच. अगदी निबंधाचे पुस्तक पण. परीक्षेची तयारी म्हणजे निबंध पाठ करणे, ते ही म्हणी सकट. मग तर झाले.

आपण स्वतःला एक प्रश्न विचारू,  आपण शेवटचे ग्रंथालयात कधी गेलो होतो? आपल्याकडे आई - वडील  मुलां सोबत लायब्ररीत जातात का? आई - वडील मुलांसाठी bedtime stories वाचतात का किंवा इतर वेळेस तरी ते एकत्र पुस्तके वाचतात का? मुलांवर अश्या प्रकारे संस्कार होतात का? वाचनामुळे मुलांची कल्पनाशक्ती प्रगल्भ होते,  याची पालकांना जाणीव असते का?  एका प्रसंगाला पुस्तक भेट दिले की झाले, एवढ्यावर थांबणे बरोबर आहे का?

Albert Einstein चे एक छान वाक्य आहे,
Imagination is more important than knowledge.

मुले जेंव्हा टिव्ही किंवा सिनेमा बघतात तेंव्हा सर्व काही घडत असते. त्याच्या उलट पुस्तक वाचताना मुले शब्द - वाक्य वाचून कथेचे विश्व रंगवतात. ते कथानकात गुंततात, त्यातील भाग होतात. टिव्ही - सिनेमातील नाटकीपण तेथे नसते. उलट त्यांची भाषा आणि विचारशक्ती समृद्ध होते. मुले बुद्धिमान होण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचायची गोडी लावणे आणि ती आवड जोपासण्यास मदत करणे.   

No comments:

Post a Comment