Monday 30 December 2013

मध्यमवर्गाची श्रीमंती!


आज मध्यमवर्गाच्या हातात चांगलाच पैसा आलेला आहे,  कुटुंब लहान होत आहे त्यामुळे मिळकत आणि खर्च याची सांगड सोपी झाली आहे. निदान बाजारात, मॉलमध्ये, आणि हॉटेल मधील गर्दी तरी हेच दाखविते.  इतरांशी तुलना करण्यापेक्षा व्यक्तीची तुलना त्याच्या आधीच्या दोन पिढ्यानशी केली तरी हेच दिसते. आता प्रश्न असा कि ही श्रीमंती वागण्यातून पण जाणवते का?

जरा विचार करू
  •   हल्ली बरेच लोक मॉल मध्ये खरेदी करतात. उंची कपडे आणि branded वस्तूंचे चाहते वाढत आहेत. पण यातील लोक जेंव्हा भाजी बाजारात जातात  (offcourse जर गरज लागली तर), तेंव्हा भाजी वाला/वालीशी ते दरासाठी वाद घालताना ही दिसतात.  थोडक्यात  multiplex मध्ये १०० - १५० रुपयात popcorn घेणारी मंडळी रस्त्यावरील भाजी वाला/वाली कडून २० रुपयाचे कणीस १८  करून घेताना दिसतात. 
  • जत्रेत १० रुपयाला मिळणारे खेळणे ९ रुपयाला मिळावे म्हणून अर्धा-अर्धा तास हुज्जत घालणारे पण आहेत.
  •  स्वतःच्या बढतीवर बारीक लक्ष ठेवणार पण घरात नोकर ठेवताना पगार/सुट्टी/बोनस यावर चर्चा करून शक्य असेल तेवढी तडजोड करण्याचे प्रयत्न करतात.  
  • आपल्याकडे आठवड्यातील कामाचे दिवस ६ पण म्हणून हाच नियम कामवाली बाईला लागू पडतो का? 
  • देवळात देणगी देणारे आणि भटाला अव्वाच्या सव्वा दक्षिणा देणारे पण वाढले आहे, यातील किती जण  स्वतःच्या आई वडिलांचा विचार करतात?
  •  भारतात उच्चशिक्षण महाग आहे, ते घेताना बरेच जण पालकांनकडून मदत घेतात. शिक्षण घेवून, नोकऱ्या स्वीकारून, कितीजण स्वतःचे राहणीमान सुधारण्या बरोबर आई वडिलांचे पैसे फेडण्याचा प्रयत्न करतात. 
  • पालक पैसे मागत नसले तरी ही पुढच्या पिढीची जवाबदारी नाही आहे का?
  • म्हातारपणी आपल्या भोवती माणसे हवी असे वाटणे साहजिक आहे तरी गाठीशी पुरेसे पैसे असणे  आणि ती खर्च करण्याची इच्छा जिवंत राहणे ही म्हत्वाचे आहे.
  • आई वडिलांचा वापर मुले संभाळण्यासाठी करणारे पण वाढत आहेत. भारतात आणि काहीतर वेळ पडली तर त्यांना परदेशीपण नेतात. बरे यात terms and conditions पुढच्या पिढीच्या असतात.
  • घेतलेले उच्चशिक्षण जर स्वतःचा संसार चालविण्यास अपुरे असेल तर अश्यावेळीस कमी शिकलेली मंडळी बरी. बरे येथे अपुरे म्हणणे हे तुलनात्मक आहे, पैसे अपुरे पडतात कारण बहुतेकवेळी गरजेपेक्षा अधिकची हाव असते. 
  • निवृत्त झालेल्यांना नवीन जवाबदाऱ्या देणे योग्य वाटते का?
  • स्वतःची वास्तू उभी करताना, काही वेळा मुले ह्यात असलेल्या आई वडिलांच्या घराबद्दल निर्णय घेवून टाकतात आणि मग "तू तिथे मी ना होता" मुले ठरवतील तसे राहण्याची वेळ म्हाताऱ्यान वर येते.
  • पुस्तके विकत घेणे वाढले आहे पण म्हणून वागणे बदलले असे म्हणता येईल का? वाचनामुळे सुसंस्कृत व्हायले हवे, ते प्रमाण दिसते का? कि पुस्तके निव्वळ सजावटीच्या वस्तू होत आहेत. 
  • आपले जुने कपडे देताना पण अपेक्षा असते कि समोरच्याने त्याची जाणीव ठेवावी. म्हणजे दान पण गाजा वाजा करून द्यायचे. "उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला ही कळू नये " या परंपरेतले आपण, खरेच बदलत आहोत.
थोडक्यात श्रीमंती वाढली कि भपकेबाजी याची गफ़ल्लत होत आहे. माणसाचे राहणीमान आणि वैचारिक उंची एकत्र वाढली तर समाजाची उन्नती होते. भिन्नवर्ग एकमेकांस पूरक हवे. वेगवेगळ्या स्तरांतील अंतर कमीतकमी व्हायला पाहिजे. नाहीतर  मिळणाऱ्या श्रीमंती बरोबर असुरक्षितता पण वाढते आणि निखळ आनंद घेणे कोणासही दुरापास्त होते.

 "There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich" - Marlene Dietrich
There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99
There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99
There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99

There is a gigantic difference between earning a great deal of money and being rich.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marlenedie385419.html#klOg1vaviiJ2LqKd.99

Thursday 26 December 2013

बिस्किटांचे गाव (pepperkakebyen)!

सबंध जगात वेगवेगळ्या देशांत, प्रांतात, गावांत वेगवेगळ्या community traditions, स्थानिक परंपरा असतात. काही वेळा त्या धार्मिक स्वरूपाच्या असतात आणि काही वेगवेगळ्या प्रसंगी सुरु होतात आणि पुढे चालू राहतात. धार्मिक, जसे सणानिमित्त जत्रा आणि इतर परंपरा, जसे दिवाळीच्या वेळीस लहान मुलांचे किल्ले   किंवा पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूरला  १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लागणारी जिलेबीची दुकाने.

 नॉर्वेच्या बर्गन (Bergen ) या गावी, नाताळच्या काळात गावाची छोटी प्रतिकृती करण्याची परंपरा आहे. याची सुरुवात
१९९१ साली झाली. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि मग स्थानिक नगरपालिकेच्या पुढाकाराने ती एक परंपराच झाली.

याचे वैशिष्ट म्हणजे सर्व आकृत्या ginger bread cookies ( सुंठ घालून केलेली बिस्किटे ) ने तयार करतात. यात घरे, शाळा, गाड्या, दुकाने, बाजार, बोटी, जनावरे आणि खूप काही असते. बिस्कीटाची आकृती तयार करून त्यावर पिठी साखर आणि रंगीत गोळ्यांनी ती सजवितात. स्थानिक नागरिक भरभरून प्रतिसाद देतात. परिसरातील बालवाड्या, शाळा, संस्था आणि हजारहून अधिक कुटुंबेयात सहभागी होतात.
 हे जगातले सर्वात मोठे आणि वैशिष्टपूर्ण असे बिस्किटांचे  गाव आहे. या वर्षी यात १९००  इमारती आणि आगगाड्या असून ३८० चौ. मी. क्षेत्रात हे वसविले आहे. प्रत्येक वस्तू ही आपल्यात कलात्मक आहे.या प्रकल्पात अगदी ३ - ४ वर्षांच्या चिमुरड्यान पासून ते पंचात्तरी  ओलांडलेले आजी-आजोबा पण सहभाग घेतात.





अश्याच पद्धतीचे गाव न्यूयॉर्क येथे ही तयार करण्यात आले आहे.  त्याची नोंद गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. ते गाव एका व्यावसायिक आचाऱ्याने तयार केले असून ते संपूर्ण खाणे योग्य आहे. तसेच  सर्व बिस्कीटे एकच पाककृती ने तयार केलेली आहेत. ते गाव गिनीस बुकसाठी लागणारी नियमावली डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे. याच्या उलट बेर्गेन येथील गाव लोक सहभागातून तयार झाले आहे.


वरील फोटो pepperkakebyen च्या फेसबुकच्या पानावरून घेतलेले आहे.  
सर्व हक्क लेखकाकडे. ब्लॉग ऍग्रीगेटर वगळता येथील मजकूर कुठेही (ब्लॉग, फेसबुक वॉल) प्रकाशित करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. लेखांविषयी इतरांना सांगायचे असेल तर कृपया ब्लॉगचा दुवा द्यावा. - See more at: http://rbk137.blogspot.no/#sthash.Jb5n5gjH.dpuf

Tuesday 24 December 2013

Library/ ग्रंथालय/ वाचनालय!

 येथे आल्यापासून आणि वेगवेगळ्या गावांतील public library बघून बरेच दिवस यावर काही लिहावे असे मनात होते पण जमत नव्हते.   २३ डिसेंबर २०१३ ला  ''सकाळ " मध्ये "झोपडपट्टीतील मुलांसाठी फिरते ग्रंथालय" हा लेख वाचला आणि मग सगळे सुचत गेले. वाचनाचा छंद असलेल्या गरीब मुलांना तो जोपासता यावा म्हणून एका महाविद्यालयातील मुले हा अभिनव उपक्रम येत्या वर्षा पासून सुरु करीत आहेत. उत्तम कल्पना आहे. मुलांना मिळणारा आनंद आणि त्याचे फायदे मोजण्या पलीकडील आहेत.  हा उपक्रम एका विशिष्ट वर्गातील मुलांसाठी आहे. ठीक. आता मुद्दा आहे इतर वर्गातील मुलांचा.

 पूर्वी उन्हाळी सुट्टीत, दोन महिने मुलांना मस्त वेळ असायचा. फार तर आजोळी जाणे  पण कुठे ही असले तरी, वाचनालयाचे सभासद होणे आणि मन मुराद गोष्टीची पुस्तके वाचणे असे प्रघात असायचे. मग या पुस्तकांची अदलाबदल होणे हे ओघाने आलेच. पुस्तके विकत घेणे किंवा भेट मिळणे याला एक मर्यादा होती. आणि हो एकत्र कुटुंब पद्धती मध्ये कुठल्या तरी मोठ्याला वाचनाची आवड असायची आणि मग बच्चे कंपनी खूष. परत हि मोठी व्यक्ती घरात नाही तर शेजारी-पाजारी असायची. थोडक्यात जवळपासच्या सर्व मुलांचे कल्याण.

 आता चित्र खूप वेगळे आहे, उन्हाळी सुट्टी म्हणजे सहली आणि त्याहून वेळ मिळाला तर शिबिरे किंवा छंद वर्ग. पुस्तके विकत घेणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. मुद्दा असा कि आपण किती ही पुस्तके विकत घेतली तरी घरीच वाचनालय होवू शकते का? दुसरे आता बऱ्याच ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धत, मुलांना वेळ कोण देणार आणि वाचनाचे संस्कार कोण करणार. ढिगाने पुस्तके आणून दिली तरी ती वाचली जाणार याची खात्री काय? ती नुस्तीच शोभेसाठी किंवा status symbol साठी नाही हे कसे समजणार?

दोन उदाहरणे,

शाळेत कोणा एका इयत्तेत  असताना वर्ग शिक्षिका असणाऱ्या बाईंनी सांगितले  की डायरी म्हणजेच रोजनिशी लिहा. खूप फायदे ही सांगितले मग काय जो तो डायरी लिहू लागला.  बरे आठवड्या नंतर त्याच बाईंनी सर्वांना आपली रोजनिशी आणावयास सांगितली. झाले मग काय, ज्यांनी लिहिली नव्हती त्यांनी एका दिवसांत ती पूर्ण केली. मागे कोण राहणार.  गंमत म्हणजे सर्वांची रोजनिशी तशी सारखीच होती, साचेबद्ध (routine) आयुष्य असल्या मुळे त्यात नवीन असणार तरी काय होते. त्यात काही प्रमाणात वाक्ये ही सारखीच होती.

तशीच दुसरी एक आठवण शाळेत शिक्षिका असलेल्या मैत्रिणीने सांगितलेली. शाळेतील मुलांचे निबंध साधारण पण  सारखेच असतात. असे कसे? उत्तर सोपे आहे,  शाळा एकच आणि शाळे नंतर क्लास पण सारखेच.  बरे क्लास सारखे नसले तरी शिक्षक वापरणार ती पुस्तके सारखीच. अगदी निबंधाचे पुस्तक पण. परीक्षेची तयारी म्हणजे निबंध पाठ करणे, ते ही म्हणी सकट. मग तर झाले.

आपण स्वतःला एक प्रश्न विचारू,  आपण शेवटचे ग्रंथालयात कधी गेलो होतो? आपल्याकडे आई - वडील  मुलां सोबत लायब्ररीत जातात का? आई - वडील मुलांसाठी bedtime stories वाचतात का किंवा इतर वेळेस तरी ते एकत्र पुस्तके वाचतात का? मुलांवर अश्या प्रकारे संस्कार होतात का? वाचनामुळे मुलांची कल्पनाशक्ती प्रगल्भ होते,  याची पालकांना जाणीव असते का?  एका प्रसंगाला पुस्तक भेट दिले की झाले, एवढ्यावर थांबणे बरोबर आहे का?

Albert Einstein चे एक छान वाक्य आहे,
Imagination is more important than knowledge.

मुले जेंव्हा टिव्ही किंवा सिनेमा बघतात तेंव्हा सर्व काही घडत असते. त्याच्या उलट पुस्तक वाचताना मुले शब्द - वाक्य वाचून कथेचे विश्व रंगवतात. ते कथानकात गुंततात, त्यातील भाग होतात. टिव्ही - सिनेमातील नाटकीपण तेथे नसते. उलट त्यांची भाषा आणि विचारशक्ती समृद्ध होते. मुले बुद्धिमान होण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचायची गोडी लावणे आणि ती आवड जोपासण्यास मदत करणे.   

Sunday 22 December 2013

आरंभशूर

 रोजच्या एकसुरी आयुष्यात नाविण्य आणण्यासाठी आपण छंद जोपासतो. मित्र - मैत्रीण, परिवार, ग्रुप मध्ये चर्चा होते आणि मग छंदाला सुरुवात. एकदम जोर शोर से.
यात प्रामुख्याने  आलेले छंद म्हणजे,  व्यायाम - सकाळ/संध्याकाळ फिरायला जाणे, पुस्तक वाचन ( धार्मिक ग्रंथ पण आले ),  … यात आता ब्लॉग लिहिण्या (blogging) ची भर पडली आहे.
 सुरुवात होते  पण  सातत्य राहते का?
बहिणाबाई म्हणतात …
'मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्या रे लाटा'

मग आज इधर और कल उधर. आज एक छंद उद्या दुसरा.

 मी  analyst आहे हा काही माझा दोष नव्हे तेंव्हा माहिती हातात आली की त्याचे आकलन (analyse)  होणे हे स्वाभाविक आहे. थोडक्यात काय तर आदत से मजबूर.  बहिणाबाई परत असे ही म्हणतात…
'मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर '

शेवटी मी  analysis करायचे ठरविले. एक लक्षात असू देत कि statistical  analyst ला एका unit/item मध्ये रस नसतो. तो संपूर्ण गटाचा अभ्यास करतो. मी तेच केले.

साधारणपणे  ४०० मराठी ब्लॉग्सचे अवलोकन केल्या वर असे दिसते कि
  •  साधारण पणे १० ब्लॉग्स पैकी ४ ब्लॉग्स 'कविता, कथा, सिनेमा, करमणूक (entertainment)चे, १  खाणे/पिणे/पदार्थ करणेची माहिती विषयी, १ technology, १ चालू घडामोडी विषयी, १ फालतू आणि २ इतर विषयीचे असतात.
  •  सातत्य न राखणारे किंवा राखू न शकणारे, साधारणपणे  ५ posts मधेच गारद होतात.
  • आणखीन एक म्हणजे एका व्यक्तीने अनेक blog सुरु केले तर सातत्य राखणे कठीण असते किंवा हातात खूप वेळ हवा. नाहीतर लोकांचा कल एका विशिष्ट blog कडेच राहतो.
  • चालू न शकणारे काही personal blogs  आहेत किंवा होते, जे देशातील- विदेशातील बातम्या (चालू घडामोडी ) देतात. एवढी online मोफत वृतपत्रे मिळत असताना कोणी blog  का वाचेल?
  • तुरळक वेळा एकच post एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या blog वर दिसते. 
  •  बरेच ब्लॉग्स जाहिरातींनी भरले आहेत.  
  • साहित्य क्षेत्राशी निगडीत लोकांना ब्लॉग्सचा विशेष फायदा होताना दिसतो.
  • तसेच आपल्या productची अप्रत्यक्षपणे जाहिरात करणारे पण आहेत.
 एवढा सगळा अभ्यासकरून मला काय करू नये एवढे मात्र समजले. आणि जे मला आवर्जून टाळायला आवडेल ते म्हणजे ब्लॉग वरून "पैसा मिळविणे ".












Thursday 19 December 2013

नावात काय आहे?

 हल्लीच माझी एक सहकारीण निवृत्त झाली. ४५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्ती. निरोप समारंभ आधी कोणीतरी विचारले, काय कसे वाटते आहे. ती अतिशय शांतपणे  म्हणाली, " it is just like going to your own funeral ". लोक तुमच्या बद्दल चांगलेच बोलतात, जुन्या आठवणी काढतात आणि मागील गमती जमती आठवतात. शेवटी चांगले खाणे- पिणे.
या बाईं विषयी थोडे.
ही बाई गावांत राहत नसून, थोड्या अंतरावरील एका island वर शेतात राहते. तिच्या कडे एक मोठे कुत्रे असून, ती रोज पहाटे ३:३० च्या दरम्यान त्याला फिरायला नेते. ऑफिसला पहाटे सव्वा पाच वाजता हजर असायची. अनेक दशकांची सवय असे समजले. ऑफिस मध्ये एकही व्यक्ती नाही जिला या बाईनी मदत केली नसेल. कायम हसतमुख आणि उत्साही. सकाळी ऑफिसात अलार्म बंद करण्यापासून कामाची सुरुवात.

William  Shakespeare म्हणतो

What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.

यात तत्थ्य वाटते का? जर असे नसेल तर माणसे, आपले  किंवा आपल्या आप्तांचे नाव प्रसिद्ध वहावे म्हणून कां झगडत असतात. शैक्षणिक/सांस्कृतिक/क्रीडा संस्था, बाजार समिती, रस्ते, मैदान, वसाहती असो किंवा या तत्सम असे काही ज्याला नाव देणे शक्य आहे. सार्वजनिक निधीतून किंवा एका पद सोबत मिळणाऱ्या निधीतून काम केले किंवा काही उभारले तर त्याला नाव देण्यात केवढा आटापिटा, वाद होतो आणि काही वेळा प्रकरण मारामारी पर्यंत जाते. कशा साठी हा एवढा अट्टाहास?

वरील सर्व लिहायचे कारण, संस्थामध्ये असणाऱ्या meeting rooms ना शक्यतो नंबर किंवा नावे असतात. नावे शक्यतो त्या संस्थेशी निगडीत प्रसिद्ध व्यक्तींची असतात. मध्यंतरी माझ्या संस्थेत एक नवीन मीटिंग रूम बांधण्यात आले. साहजिक त्या रूमला नाव काय द्यावे याची चर्चा झाली आणि शेवटी सर्वानुमते असे ठरले कि त्या रूमला या बाईंचे नाव द्यावे.  ४५ वर्षे निश्चल मनाने काम केले त्याची पावती.

ज्या दिवशी मला हे समजले मी केवढी भारावून गेले म्हणून सांगू. राहून राहून मी विचार करत होते कि आपल्याकडे हे शक्य आहे का? कश्यास ही नाव देणे हे ही निव्वळ राजकारण असते हे आपण जाणतो. तेंव्हा आपल्याकडे असलेल्या  heirachy मुळे, एका मीटिंग रूम ला एका receptionist चे नाव दिले जाऊ शकते का?
काम किती ही वर्षे आणि कसे ही केले म्हणून काय झाले. अशी कृतज्ञता आपल्या कडे शक्य आहे का?

"We are all equal" हे  वाक्य अनेक सुविचारा सोबत शाळेच्या भिंती पर्यंतच सीमित असते.
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99
What's in a name? That which we call a rose by any other name would smell as sweet.
Read more at http://www.brainyquote.com/quotes/quotes/w/williamsha125207.html#uGzJ7CEItmzdJzXb.99

Tuesday 17 December 2013

स्त्रीचे (बाईचे ) खरे घर कोणते?

भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीत खूप भिन्नता आहे आणि त्याची सुरवात होते घरा पासून.

पाश्चात्य संस्कृतीची झलक दाखवणारी  दोन उदाहरणं, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची प्रसिद्ध लेखिका, Jane Austin  किंव्हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीची लेखिका Lucy Maud Montgomery. Jane इंग्रज तर Lucy ही कॅनेडिअन. दोघींच्या कादंबरीत मुख्य पात्र शक्यतो स्त्री. त्याकाळातील स्त्री आणि तिच्या अवतीभवती गुंफलेल्या कथा. अनेक कथानकात साधारणपणे…

मुलीचे लग्न ठरले कि मग तिचा होणारा नवरा, श्रीमंत असो वा गरीब,  तिला तिच्या घरा बद्दलच्या अपेक्षा विचारतो. त्याच्या ऐपती प्रमाणे तो घर घेतो. कुलीन किंव्हा श्रीमंत असेल तर काही सांगायला नको. तो तिला घरात हवे तसे बदल  करून घेण्यास सांगतो.  बरे जर तो मध्यम किंव्हा श्रमिक वर्गाचा असेल तरी देखील त्याच्या ऐपती प्रमाणे तो घर बघतो.  अश्या वेळेस त्याचे आणि तिचे नातलग आणि त्यांचा मित्र परिवार त्यांना घर लावण्यास मदत करतात.

 लग्नानंतर स्त्री 'त्याच्या आणि तिच्या' घरी जाते. घर लावते. स्वतःच्या संसारात हळू हळू सर्व शिकते आणि रुळते. ते दोघे मिळून आपला संसार लावतात, तो पुढे चालवतात. तिचे आणि त्याच्या घरचे त्यांना मदतीस येतात पण तात्पुरते. स्त्री जवाबदार होते. आपली मुले आणि संसार ती आपल्या पद्धतीने करते. १०० आणि २०० वर्षा पूर्वीच्या काळात अतिशय गरज असल्याशिवाय स्त्रीचे बाहेर काम करणे सहसा दिसत नाही. कथां मधून शेतात किंव्हा व्यवसायात मदत करणारी स्त्री दिसते पण मुख्यतो घराची जवाबदारी स्त्रीची आणि बाहेरची पुरुषाची. असेच दिसते आणि मुख्य म्हणजे तिचे स्वातंत्र जोपासले जाते.

 या गोष्टी १०० - २०० वर्ष पूर्वीच्या. पुढे तर तिला अजून शिक्षण मिळाले आणि समाजात बळकट स्थानपण.

याच्या उलट आपल्याकडे, लग्न होउन मुलगी सासरी जाते. बाहेरगावची नोकरी सोडली तर मोठ्या प्रमाणात मुली सासरीच जातात. ते घर 'सासर' असते. त्या घरातील ज्येष्ठ  व्यक्ती तिला काही सांगताना 'आमच्याकडे' असे असते, इथूनच सुरवात करते. एकत्र कुटुंबात राहताना, तिचा संसार कुठे सुरु होतो? वेगळे व्हायचा अर्थ किंवा स्वतःचा संसार लावणार म्हणजे 'घर मोडणार'. परत काही वेळा नाफातोट्याचा विचार होतो आणि विभक्त होणे टाळले जाते. घरातील जेष्ठ निवृत्त झाले कि कुटुंबाची धुरा पुढच्या पिढी कडे येते. लक्षात घ्या कुटुंबाची धुरा. मग ती कुटुंब सांभाळते, तो तिचा संसार नसतो, ती फक्त आपली 'position ' सांभाळते. वयाची पन्नाशी जवळ आल्यावर संसारची हौस तरी अशी काय राहणार. बहुतेक वेळा, जवाबदारी पारपाडणे म्हणजे 'संसार'. स्त्रीचे स्वातंत्र जपले जात नाही. मग ती लहान असो व मोठी. अश्यावेळी जी पिढी सोशिक असते ती सोसते. घर फुटू नये च्या नावा खाली एक प्रकारचे शोषण चालते. काही वेळा मध्यमवयीन स्त्रीला स्वातंत्र हवे असते, मुले जरा मोठी झाली कि ती आपल्या आवडी निवडी जोपासू पाहते. यात काही यशस्वी पण होतात, पण त्या वेळी सुद्धा अपराधीपणाची जाणीव येत नाही असे ही नाही. 

जिथे नवीन संसार मांडला जातो तिथे काही प्रमाणत स्वातंत्र असते आणि अश्यावेळी त्याच्या किंवा तिच्या घरची मंडळी एका मर्यादे पर्यंत राहिली तर नाती छान सांभाळली जातात. ती आणि तो एकमेकाच्या मदतीने बहरतात.
म्हणतात ना!
घर असावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती



Sunday 15 December 2013

लिखाण/blogging

ज्ञान हे कणा कणा ने वाढते. हे तंतोतंत खरे आहे. ते मिळविण्यात कोण आनंद असतो हे आपण रोजच्या धकाधकीत विसरतो.  आज आपल्याला अलभ्य लाभ झाला किंव्हा अरेच्या असे होय, असे आपण किती वेळा म्हणतो.  मोठ्या गोष्टींच्या मागे लागण्यात आपण लहान सहान आनंदाला मुकतो.  

मला वेगवेगळ्या विषयावरील लिखाण वाचायला आवडते आणि त्या वर चर्चा करणे ही. लेखामुळे लेखकाचे मत कळते पण लोकांशी चर्चा केल्याने किंव्हा मतांची देवाण घेवाण केल्याने आपल्याला अनेक नवीन मुद्धे समजतात आणि चुकांची दुरुस्ती होते. त्यासाठी आपण आपली मते सांगितली पाहिजे. मग मुद्दा असा कि आपल्याला हवा तसा मित्र परिवार किंव्हा group कुठे मिळणार.

काही लोकांशी चर्चा केल्या वर एक छान पर्याय मिळाला, blog सुरु करण्याचा. खूप हुरूप आला. आणि अचानक…

१ डिसेंबर २०१३ च्या लोकरंग मध्ये नारायण कुलकर्णी कवठेकर यांचा लेख वाचनात आला "निर्मिती आणि निर्मिक".  मला लेख आवडला आणि सर्व मुद्दे पटले.  त्यात "थकीहारी प्रतिभाएं"  हे बिरुद वाचले. लेखकाने अनेक उदाहरणातून हे सुचविले कि लेखन हे फावल्या वेळात करण्याची गोष्ट नव्हे. झाले 'फुस्स्स्स '. आता पुढे काय?

नेहमी अनेक वृतपत्रे, नियतकालिके आणि पुस्तके वाचणारी मी, गम्मत म्हणजे मराठीतील blogs धुंडाळू लागले. तुमच्यापैकी बर्याच लोकांच्या blogs चा मी survey केला आणि अहो आश्चर्यं माझे मलाच कळले कि माझा हेतू लेखिका होण्याचा नाही आहे मी आपली एक 'comman  woman ' आहे जिला स्वताची अशी मते आहेत आणि ती मी वाचकांशी (जर कोणी वाचली तर :) ) share करत आहे. एवढेच!
लेखन हा माझा व्यवसाय नव्हे, तेंव्हा आपण खूप काळजी करण्याचे कारण नाही. आपण मराठी तून लिहिणार आणि कुणी सांगावे उद्या समान आवडी असणारा group भेटेल.  त्या सर्व bloggers ना जे blogging मध्ये माझे वरिष्ट आहेत आणि नियमित पणे तो सांभाळत आहे माझा सलाम.

  शेवटी पु. लंच्या शब्दात
"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. ” 
Blogging हा माझा छंद आहे आणि तो मी जोपासणार.


Tuesday 10 December 2013

विश्वास


लिखाणाचे निमित्त गेल्या रविवारच्या सप्तरंग मध्ये आलेला संदीप वासलेकर यांचा लेख ' विश्वास ठेवायला शिका'. 

मध्यंतरी वाचण्यात आले की  भारतात  2.89% लोक income tax return भरतात. फक्त 3% लोकांचा पगार return भरण्या  इतका आहे आणि बाकीच्यांचा नाही याच्या वर विश्वास ठेवणे अवघड आहे.
आपल्या कडे खूप मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या पावत्या (cash receipts)  कच्या स्वरूपाच्या असतात, अगदी   मोठ्या व्यापारांकडून सुद्धा असे होणे गैर धरले जात नाही. एखाद्याने आग्रहाच धरला तर पावती मिळते, बहुतेक नाराजी पत्करून.  यात औषध  दुकाने, किराणामाल व्यापारी, सोनार, अगदी dentist, आणि डॉक्टर सुद्धा येतात. ही यादी मारुतीच्या शेपटी सारखी वाढू शकते. हे सर्व अतिशय सत्छील मनाने सर्व करतात आणि फक्त वेळ वाचवायला पावती देत नाही, ह्या वर विश्वास ठेवणे कठीण आहे.

अतिशय धोक्याचे म्हणजे एखादा औषध दुकानदार तारीख गेलेले औषध देणार नाही याची देखील गवाही देता  येणार नाही. मुद्दाम म्हणून नव्हे तर, हे किती गंभीर आहे याची बर्याच जणांना माहितीच नाहीये.  औषध दुकानात  pharmacyचे  पदवीधर कितीजण असतात,  बहुदा ज्याच्या नावावर दुकान किंव्हा licence असते तेवढा एकच.

माणूस हा सवयींचा गुलाम असतो चांगल्या - वाईट दोन्ही. जर आपण कायदा पाळला तर आपली पुढची पिढी ते शिकणार.चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो पण ते काही अशक्य नाही. विकसित देशात कायदा पाळायची सवय झाल्याने दुसरी व्यक्ती काही गैर करेल असे साधारण पाने कोणाच्या ध्यानी येत नाही आणि म्हणून ते विश्वास ठेवतात. 

विकसित देशात कायदा मोडणे तसे सोपे नाही, परत तिथे पळवाटा ही नाही. 'हम करे सो कायदा' हे फक्त आपल्या देशात. एक सोपे उदाहरण म्हणजे तीन वेळा गाडी चालवण्याचे नियम मोडले तर  driving licence रद्द होते. स्पीड लिमिट साठी जागो जागी कॅमेरे लावून तपासणी होत असते. सर्वात सोयीची गोष्ट असते कायदा पाळणे.  आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे परदेशी विद्यापीठात master किंवा PhD चे संशोधन (thesis) जमा केल्या वर  मुल्यांकन  करण्यास पाठवण्याच्या आधी एका विशिष्ट software द्वारे त्याची विश्वासहर्ता तपासली जाते.

 लेखात  म्हटले "…जर नागरिक लोकप्रतिनिधींकडं आपली खासगी गाऱ्हाणी घेऊन गेले नाहीत, तर लोकप्रतिनिधी अवैध मार्गानं पैसे कमावू शकणार नाहीत."
सर्वांना शिक्षण आणि पुढे नोकरी/व्यवसाय नियमानुसार मिळाला तर लोकप्रतिनिधींकडं जायचे प्रमाण कमी होणार. सर्व आर्थिक व्यवहार बँके मार्फत होणे गरजेचे आहे जेणे करून फसवणे सोपे राहणार नाही.  तसेच प्रत्येक व्यवसायाला आपण मान दिला पाहिजे आणि योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे.  जेंव्हा समाजाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारेल तेंव्हाच एकमेकावरील विश्वास आपोआप वाढेल.



Thursday 5 December 2013

Social media , संस्कृती आणि lucky bitch

आपली संस्कृती आणि आपले संस्कार, ह्या विषयी आपण नेहमीच काही तरी ऐकत वाचत किंवा बघत असतो. लहानपणा पासून घरातून आणि परिसरातून आपल्यावर कळत नकळत संस्कार होत राहतात. पुढे ते आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग होतात.
हे संस्कार म्हणजे तरी काय? आपल्या जडण घडण साठी लागणारी सामुग्री म्हणजे संस्कार. चालीरीती (चालणे - बोलणे - वागणे), खाण्यापिण्याच्या सवयी, विचार करण्याची पद्धत आणि खूप काही संस्कार नावाच्या पोतडीत सामावले आहे. यातून आपण घडतो.
घरांघरात जश्या खाण्याच्या सवयी वेगळ्या तश्याच वाग्ण्याच्याही. एकीकडे जळजळीत मिरची असलेले कालवण तर दुसरी कडे तिखटाशिवाय जेवण. भाषेचे पण तेच. साधारण पणे असे दिसते की माणूस शिकलेला असला की कुठे काय बोलावे आणि मुख्य म्हणजे काय बोलू नये याची समज येते. 
मला खूप पूर्वी पासून एक प्रश्ण पडत असे, 'शिव्या' बद्दल,  देणे चांगले कि वाईट. घरात विचारायची सोय नव्हती आणि मित्रांना विचारावे तर लाज. एवढेच समजले की शक्य तो राग आल्या शिवाय किंवा भांडणाशिवाय वापर होत नसतो. थोडक्यात काय तर दुसर्याला डिवचायला म्हणून उपयोगी.
social media  ने माझी ती समजूत पार ढवळून टाकली आहे. कारण अगदी सोपे आहे, खूप शिकलेली (डब्बल डिग्र्या घेत ),  भरपूर पगार घेत असलेली माणसे, आणि हो ज्यांच्या वर संस्कार नीट झाले होते (अशी माझी भाबडी समज ) ती माणसे,  बिनदिक्कत शिव्यांचा वापर करत असतात. पण कां?
शिव्यात प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात, अर्थ नसले आणि अर्थ असलेले. रोष किंवा प्रेम दाखवायला अपशब्द वापरणे गरजेचे आहे का? स्वतःला cool सिद्ध करण्यासाठी दुसरा काहीच उपाय नाही का?
कोणावर आपुलकी दाखवायला "lucky bitch ", "साले हरामी" अशी बिरुदे जोडणे बरोबर आहे का?  उद्या मुलाने आपल्या वडिलांस प्रेमाने अशी हाक मारली तर चालेल का? इथे काही चुकत आहे कि मी काळाच्या मागे पडले आहे?





 
 

Wednesday 4 December 2013

माझे e - पुराण!



बरेच दिवस मनाची घालमेल चालू होती. आपण लिहावे की नाही. भाषा हे आपले प्रांत नव्हे मग काही चुका झाल्या तर किंवा लोक वाचतील का किंवा त्या हून पुढचे म्हंजे बरे दिसेल का? स्वताच्या मर्यादांची माहिती असणे काही बरे नव्हे, आपण मागे खेचलो जातो. perfection  मिळविण्याच्या नादात आपल्या मनातले मनातच राहते आणि मग कालांतराने विसरले जाते. सुधारणे काही होत नाही. शेवटी मारली उडी.

एकच विनंती विशेष, कुठे हि स्वतःला शोधू नका.