Tuesday 17 December 2013

स्त्रीचे (बाईचे ) खरे घर कोणते?

भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीत खूप भिन्नता आहे आणि त्याची सुरवात होते घरा पासून.

पाश्चात्य संस्कृतीची झलक दाखवणारी  दोन उदाहरणं, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची प्रसिद्ध लेखिका, Jane Austin  किंव्हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीची लेखिका Lucy Maud Montgomery. Jane इंग्रज तर Lucy ही कॅनेडिअन. दोघींच्या कादंबरीत मुख्य पात्र शक्यतो स्त्री. त्याकाळातील स्त्री आणि तिच्या अवतीभवती गुंफलेल्या कथा. अनेक कथानकात साधारणपणे…

मुलीचे लग्न ठरले कि मग तिचा होणारा नवरा, श्रीमंत असो वा गरीब,  तिला तिच्या घरा बद्दलच्या अपेक्षा विचारतो. त्याच्या ऐपती प्रमाणे तो घर घेतो. कुलीन किंव्हा श्रीमंत असेल तर काही सांगायला नको. तो तिला घरात हवे तसे बदल  करून घेण्यास सांगतो.  बरे जर तो मध्यम किंव्हा श्रमिक वर्गाचा असेल तरी देखील त्याच्या ऐपती प्रमाणे तो घर बघतो.  अश्या वेळेस त्याचे आणि तिचे नातलग आणि त्यांचा मित्र परिवार त्यांना घर लावण्यास मदत करतात.

 लग्नानंतर स्त्री 'त्याच्या आणि तिच्या' घरी जाते. घर लावते. स्वतःच्या संसारात हळू हळू सर्व शिकते आणि रुळते. ते दोघे मिळून आपला संसार लावतात, तो पुढे चालवतात. तिचे आणि त्याच्या घरचे त्यांना मदतीस येतात पण तात्पुरते. स्त्री जवाबदार होते. आपली मुले आणि संसार ती आपल्या पद्धतीने करते. १०० आणि २०० वर्षा पूर्वीच्या काळात अतिशय गरज असल्याशिवाय स्त्रीचे बाहेर काम करणे सहसा दिसत नाही. कथां मधून शेतात किंव्हा व्यवसायात मदत करणारी स्त्री दिसते पण मुख्यतो घराची जवाबदारी स्त्रीची आणि बाहेरची पुरुषाची. असेच दिसते आणि मुख्य म्हणजे तिचे स्वातंत्र जोपासले जाते.

 या गोष्टी १०० - २०० वर्ष पूर्वीच्या. पुढे तर तिला अजून शिक्षण मिळाले आणि समाजात बळकट स्थानपण.

याच्या उलट आपल्याकडे, लग्न होउन मुलगी सासरी जाते. बाहेरगावची नोकरी सोडली तर मोठ्या प्रमाणात मुली सासरीच जातात. ते घर 'सासर' असते. त्या घरातील ज्येष्ठ  व्यक्ती तिला काही सांगताना 'आमच्याकडे' असे असते, इथूनच सुरवात करते. एकत्र कुटुंबात राहताना, तिचा संसार कुठे सुरु होतो? वेगळे व्हायचा अर्थ किंवा स्वतःचा संसार लावणार म्हणजे 'घर मोडणार'. परत काही वेळा नाफातोट्याचा विचार होतो आणि विभक्त होणे टाळले जाते. घरातील जेष्ठ निवृत्त झाले कि कुटुंबाची धुरा पुढच्या पिढी कडे येते. लक्षात घ्या कुटुंबाची धुरा. मग ती कुटुंब सांभाळते, तो तिचा संसार नसतो, ती फक्त आपली 'position ' सांभाळते. वयाची पन्नाशी जवळ आल्यावर संसारची हौस तरी अशी काय राहणार. बहुतेक वेळा, जवाबदारी पारपाडणे म्हणजे 'संसार'. स्त्रीचे स्वातंत्र जपले जात नाही. मग ती लहान असो व मोठी. अश्यावेळी जी पिढी सोशिक असते ती सोसते. घर फुटू नये च्या नावा खाली एक प्रकारचे शोषण चालते. काही वेळा मध्यमवयीन स्त्रीला स्वातंत्र हवे असते, मुले जरा मोठी झाली कि ती आपल्या आवडी निवडी जोपासू पाहते. यात काही यशस्वी पण होतात, पण त्या वेळी सुद्धा अपराधीपणाची जाणीव येत नाही असे ही नाही. 

जिथे नवीन संसार मांडला जातो तिथे काही प्रमाणत स्वातंत्र असते आणि अश्यावेळी त्याच्या किंवा तिच्या घरची मंडळी एका मर्यादे पर्यंत राहिली तर नाती छान सांभाळली जातात. ती आणि तो एकमेकाच्या मदतीने बहरतात.
म्हणतात ना!
घर असावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती



No comments:

Post a Comment