Sunday 23 February 2014

वीकेंड स्पेशल!

शनिवार - रविवार साठी राखीव कार्यक्रम म्हणजे अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांचे वाचन किंवा चाळण. रोज तसे ठराविक वृत्तपत्रे चाळली जातात. वाचण्या सारखे बहुतांश वेळी काही नसते. असो.

आज रविवार २३ फेब्रुवारी रोजी, मला म.टा (महाराष्ट्र टाईम्स ) मधील हे दोन लेख आवडले, पटले.

  1. सोशल मीडिया नव्हे, राजकारण बदला  … ए भाई जरा देख के चलो- काय खरे काय खोटे ...

Sunday 16 February 2014

निमित्त - विद्यावंतांची बधिरता!

मागिल काही आठवडे व्यवसाय आणि फिरती या मुळे ब्लॉग लिखाण होऊ शकले नाही. आज मात्र ते शक्य होईल असे वाटत आहे. एक प्रयत्न, आधार लोकसत्तेतील लेख

   " …  शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम एका परदेशी कंपनीला देण्यासाठीच शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण करण्यात आल्याचा संशय खासगी चर्चेत व्यक्त होत आहे. एका परदेशी कंपनीला काम देण्यासाठीच गेले महिनाभर शहरातील कचऱ्याचा प्रश्न चर्चेत ठेवण्यात आला होता, …"  



पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न या विषया वरील लेख आहे. दुर्दैव आहे कि कचरा आमचा पण त्याची काळजी/विल्हेवाट लावायला आम्हाला जमत नाही. यात दोष कुणाचा आहे?  हे विचार करायला देखील आम्हाला वेळ आहे का?
 
ही बातमी वाचल्या वर मला दुर्गाबाई भागवत यांच्या व्यासपर्व या पुस्तकातील भाग आठवला
"विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला मोठा शाप आहे. बुद्धिवंतांची संवेदनक्षमता करवंडली की मग पाशवी बलाचाच आग्रह अनावर होतो. स्वत्;ची कीव करत भले भले बसतात आणि मग चळवळे, दुय्यम दर्जाचे लोक सामर्थ्याची सारी क्षेत्रे काबीज करतात. पण ती त्यांनाही फार काळ पेलत नाहीत. जागा मोठ्या माणसे लहान - असे उलटे गणित सुरू होते. हे उलट्या गणिताचे चक्र द्रोणाने युगापूर्वी फिरवले. अजून ते तसेच फिरते आहे."

हे येथे हि लागू पडते, कसे? पुण्यात किंवा विचारांचा आवाका वाढवू, महाराष्ट्रात  एक आय आय टी,  अनेक नामवंत  इंजीनियरिंग कॉलेज, एग्रिकल्चर कॉलेज, विज्ञाननिष्ट विद्यापीठे आणि अनेक संशोधन संस्था आहेत, त्यातील national chemical laboratory, खुद्द पुण्यातच आहे.  या सर्व संस्था मधून महत्वाच्या  विषयांवर संशोधन चालते. यातील अनेक संस्था आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आहेत.

रोज निर्माण होणारा कचरा, हा इतका शुल्लक विषय आहे का कि अजून कोणी या बाबतीत पुढाकार  नाही घेत आहे? ( अनेक पालिका आणि महापालिकांचा कचरा व्यस्थापन या विषया वरील बातम्या आता नियमित पेपर मध्ये येतात तेंव्हा हा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे ).   कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया या आशयाच्या प्रकल्प वर काम करण्यात कमी पण येतो का? त्याला अनुदान मिळत नाही का?  अनुदान देणाऱ्या संस्थांना यातील गांभीर्य जाणवत नाही का? मोठ्या संस्था मधून चालणारे संशोधन समाजाभिमुख नको का?

पेपरात जेंव्हा आंतर  शालेय, विभागीय विज्ञान प्रदर्शन ची माहिती असते, तेंव्हा एक तरी प्रकल्प कचरा व्यवस्थापन/प्रक्रिया  वर असतो. जेंव्हा लहान प्रमाणावर हे प्रकल्प होऊ शकतात मग पुढे कां  नाही. बालवयात केलेले संशोधन हे निव्वळ  time pass म्हणून असतात का?

सर्व सामान्य नागरिक यात कश्या प्रकारे मदत करु शकतात? तर घरीच कचऱ्याचे वर्गीकरण करून. जेणे करून ओला आणि सुका कचरा वेगळा होऊ शकतो. परत सुक्या कचऱ्यात ही वर्गीकरण करता येते, उदाहरणार्थ  कागद, प्लास्टिक, रासायनिक (निरुपयोगी सेल (battery) )  आणि इतर. 

शेवटी एकच सांगायचे आहे आपण विद्यावंत असो किंवा सामान्य नागरिक, आपण या समाजाचे देणे लागतो तेंव्हा प्रत्येकाने समाजाचे कल्याण होईल याच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. माणूस जितका जास्त विद्यावंत त्याची जवाबदारी तेवढीच जास्त. ती टाळणे म्हणजे  मिळालेल्या ज्ञानाचा अपमानच करणे.