Thursday 2 January 2014

भारताचा अर्वाचीन इतिहास - भाग १

शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातील सिंधू घाटी सभ्यता (हडप्पा आणि मोहनजोदडो)चे चित्रांमुळे मी खूप भारावून गेले होते असे अजून देखील आठवते. पुढे इतिहास हा विषय घेता आला नाही हे ही खरेच. पण मनात कुठे तरी याचा अभ्यास करावा, निदान आपल्या पुरते वाचन तरी करावे असे होतेच.

या नवीन वर्षातले हे एक उपक्रम आहे, एक निर्धार केला आहे, भारताच्या अर्वाचीन इतिहास संबंधी वाचन करण्याचा. 
    
भारताची सुरुवात कशी झाली, कसा होता मूळ भारत. युगायुगांतून भारतात झालेले बदल. वेगवेगळ्या काळातील  लोकांचे राहणीमान, चाली - रिती, समाजाची कल्पना काय असेल, या बद्दल उत्सुकता आहे. एखादा विषय अभ्यासक्रमातून शिकताना गोष्टी सोप्या होतात. नवनवीन माहिती पुरवणारा अध्यापक/ प्राध्यापक वर्ग आपणास मदत करतो. आता मात्र माझी उत्तरं मलाच  शोधायची  आहेत. 

 मला मिळालेले साहित्य प्रचुर मात्रेत असून मी माझ्या आवडीचा काही भाग मराठीत टिपून घेत आहे. ते मी ब्लॉगवर देत आहे.  ५००० वर्षा पूर्वीच्या मानवी जीवनाची नुसती कल्पना सुद्धा केवढी वेगळी वाटते.
भारताच्या अर्वाचीन इतिहासाचे अभ्यास करण्याकरिता, काही विशिष्ट पद्धती वापराव्या लागणार आहेत. त्याची करणे अनेक आहेत.  आमचे केवढे दुर्दैव म्हणावे कि एवढे प्राचीन राष्ट्र/संस्कृती असून ऐतिहासिक गोष्टी आणि त्या संबंधी चे लिखाणा बाबतीत केवढी उदासीनता होती.  असे म्हणतात कि मध्य युगातील अनेक भारतीय राजे शिक्षण आणि साहित्या बाबतीत युरोपातील समकालीन  राजां पेक्षा कितीतरी पटीने उजवे होते.  एक उदाहरण, साधारण  ६०० - ६४० इसवी या काळातील उत्तर भारतातील सम्राट हर्षवर्धन. त्याच्या काळात उत्तर भारताचे चीनशी राजकीय पातळीवर संबंध होते पण तरी देखील या सर्व गोष्टींचे लिखाण करून जतन करावे याची जाणीव नव्हती. दरबारातील गायक मौखिक रीतीने सारे जतन करित होते पण ऐतिहासिक बारकाव्यांचे दस्तावेज नसल्याने योग्य जतन होऊ शकले नाही.  इतिहासात नोंद फक्त कलहना लिखित 'राजतरंगिनी ' ची आहे. राजतरंगिनी, संस्कृत मध्ये बाराव्या शतकात लिहिलेली असून, यात काश्मीरच्या इतिहासाचे, राज्य परंपरांचे, राजाला मध्य स्थानी ठेवून केलेले वर्णन आहे. इतिहासकार रॉबिन आर्थर डोकीनच्या मते कलहना शिवाय या आधी कोणी भारतीयाने केलेले इतिहासाचे लिखाण कुठेही सापडत नाही. कालबद्ध असे हे पहिले पुरातन साहित्य आहे.  'राजतरांगिनी' हे काव्य स्वरूपात असून त्याकाळातील संस्कृत मध्ये आहे, तेंव्हा प्रत्येक गोष्टीचा स्पष्ट असा उलगडा होत नाही. काही शब्दांचे द्वी अर्थ निघतात, जे गोंधळात भर घालतात. यालाच धरून मार्क स्तेइन हा पुरातत्वेत्ता, म्हणतो "the very redundant praise and flattery which by custom and literary tradition Indian authors feel obliged to bestow on their patrons".  खऱ्या तथ्यावर किती पुटे चढली कोण जाणे. 

पण उर्वरित भारताबद्दल, कलहनाच्या जोडीचे काहीही सापडत नाही अगदी मुस्लिम साम्राज्य येईस्तोवर. बरे पुराणा बद्दल ही तेच, लिखित स्वरूपात आढळत नाही. लेखीस्वरूपातील दस्तावेज आणि पुरातत्व विज्ञानच्या उपयोगातून मिळालेले आलेख यांच्यामुळे गोष्टींना दुजोरा मिळतो आणि इतिहासातील कोडे उलगडत जाते. लेखी पुरावे न सापडत असल्यामुळे  आम्हाला पुरातत्वविज्ञान  वर अवलंबून राहायला हवे. राजा विक्रमादित्य खरच होता का, या बद्दलही ठोस असे पुरावे अजून मिळालेले नाही.  तसेच जे काही पुरावे पुरातत्व विभागाला सापडले आहे, त्यांची सांगड माहित असलेल्या राजवंशाच्या यादीशी होत नाही,  कालखंड माहिती यातही तफावत जाणवते,  काही कथा काल्पनिक ही आहेत.

ग्रीक किंवा रोम सारखी गुलामगिरीची प्रथा भारतात कधी ही नव्हती. आशियाचा आभ्यास करताना चीन आणि भारताचे  वर्चस्व प्रामुख्याने दिसते पण चीन कडे १००० ई. पू. पासूनची व्यवस्थित माहिती आहे,  ही माहिती  ऐतिहासिक कागदपत्रातून,  कुटुंब नोंदणी,  न्यायालयीन नोंदणी,  नाणी,  शिलालेख  इत्यादीतून स्पष्ट होते, तसे मात्र भारताबद्दल नाही.

अति प्राचीन भारत कसा होता? लहान वसाहती, त्यांचे व्यवहार, शेती, हस्तकला आणि श्रमाची विभागणी कशा पद्धतीने व्हायची? या वसाहतीत लोखंड आणि मीठ कुठून यायचे? भारतातील मध्यमवर्गाचा उदय कधी, केंव्हा आणि कसा झाला? नारळ सारख्या वस्तूंचा व्यापार कसा सुरु झाला? आज देखील अस्तिवात असलेल्या काही प्रथांचे मूळ काय? अश्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे हळू हळू सापडतील.

 इतिहासाचा विचार काळा प्रमाणे आणि झालेल्या प्रगतीवरून केलेला आहे.

या अभ्यासासाठी अनेक संदर्भ (references ) लक्षात घेत असून सर्वांची यादी शेवटच्या भागात देईन. 

No comments:

Post a Comment