Friday 31 January 2014

Wild Swans: Three Daughters of China


पुस्तक माहिती :
मी परीक्षण असे नाही म्हणणार कारण मी स्वतः तेवढ्या ताकदीची लेखिका नाही.

 हे पुस्तक विसाव्या शतकातील चीन मधील एका घराण्यातील तीन पिढ्यांची (खरे तर तीन पिढ्यांच्या स्त्रियांची ) कथा आहे.   Jung Chang (जुंग चांग) ही पुस्तकाची लेखिका असून, पुस्तकात एकूण तीन भाग आहे,  प्रथम आजी, मग आईची कथा आणि शेवटी  Jung चे आत्मकथन. 

एका British university तून  डॉक्टरेट (PhD) मिळवलेली पहिली चिनी व्यक्ती म्हणजे Jung Chang. १९७८ साली ती सरकारी शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला गेली आणि अनेक टप्पे पार करत १९८२ मध्ये भाषा विषयात यॉर्क विद्यापीठातून डॉक्टरेट हि पदवी संपादन केली. जुंग चांगची बरीच पुस्तके प्रसिद्ध झालीत. त्यात सर्वात गाजलेले पुस्तक म्हणजेच "Wild Swans: Three Daughters of China".  पुस्तक १९९१ साली प्रथम प्रसिद्ध झालं. या पुस्तकाचा ३७ भाषण मध्ये अनुवाद झाला आहे आणि कोटी हून अधिक पुस्तके विकली गेली आहेत. हल्लीच मराठी अनुवाद झाल्याचे वाचनात आले होते. 

पुस्तकाची सुरुवात  जुंगच्या आजीच्या कथे पासून होते. आजीचा जन्म एका गरीब घरात झाला होता. आजीचे वडील तिचे लग्न लावण्यापेक्षा त्या काळातील पद्धती प्रमाणे तिला एका मोठ्या लष्कर अधिकारयाची नावाची बायको म्हणून देतात (थोडक्यात विकतात), प्रत्क्षात त्या लष्कर अधिकाऱ्याला एक बायको आणि अनेक ठेवलेल्या बायका असतात. त्यात जुंगच्या आजीची भर पडते.  पण या संबंधामुळे  आजीच्या वडिलांचे समाजातील स्थान बळकावते. त्यावेळी मात्र अतिशय तरुण अश्या आजीची अवस्था फार कठीण असते.  तिला राहायला तिच्यात गावात मोठे घर आणि सुखसुविधा असतात पण तेवढ्याच अटीपण असतात. त्यातली एक अट अशी कि ती स्वतःच्या आई वडील यांना देखील भेटू शकत नव्हती.

त्या तथाकथित लग्नानंतर ७ वर्षाने जुंगच्या आईचा जन्म झाला. अनेक चित्र - विचित्र घडामोडी नंतर मात्र सुदैवाने वयाच्या २४व्या वर्षी तिची आजीची त्या लष्करी अधिकाऱ्याच्या पाशातून  सुटका होते. ती परत आपल्या आई वडिलांकडे येते पण तेथे हि सर्व आलबेल असते कारण तिचे वडील तो पर्यंत एक बाई घरात आणतात आणि तिला ते सर्व हक्क देतात. ज्यामुळे  जुंगची आजी आणि तिची आई हवालदिल होतात. काही काळाने जुंगची आजी पुन्हा लग्न करते, या वेळीस खरे लग्न होते पण तिचा नवरा तिच्या हून वयाने खूप मोठा असतो.  आजीचा हा नवरा एक प्रतिष्ठित घराण्यातील असून डॉक्टर होता. त्याची मुले जुंगच्या आजीपेक्षा वयाने मोठी होती आणि त्यांना वडिलांचे हे लग्न मान्य नव्हते. तेंव्हा तो डॉक्टर आपले राहते घर आणि संपत्ती मुलांच्या स्वाधीन करून, आपल्या नवीन पत्नी आणि तिच्या मुलीला घेवून  दुसऱ्या गावी निघून जातो. ते दोघे नवीन गावी संसार थाटतात आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी पण होतात.  जुंगच्या आई ला तिच्या आई आणि सावत्र वडिलां कडून खूप प्रेम मिळते.

पुस्तकाचा दुसरा भाग जुंगच्या आई  (Bao Qin/De-hong) विषयी आहे.   वयाच्या पंधराव्या वर्षी जुंगची आई कम्युनिस्ट पार्टीची आणि माओच्या रेड आर्मीची कार्यकर्ती झाली. आपल्या कामात ती अतिशय प्रामाणिक  होती आणि एक आदर्श कार्यकर्ता म्हणून तिची ओळख होती. त्या मुळे  पार्टीत तिची प्रगती होऊन तिचा ओहदा वाढत गेला. पार्टीसाठी काम करत असताना तिची भेट जुंगच्या वडिलांशी झाली आणि त्यांनी लग्न केले. कम्युनिस्ट पार्टीतील वरिष्ठ अधिकारी असल्याने सुरवातीची काही वर्षे त्यांना विशेष सुविधा मिळत होत्या. पुढे काही गोष्टी मुळे, विशेष करून माओच्या धोरणांना विरोध केल्यामुळे ते दोघे दोषी ठरवले गेले आणि मग मात्र त्यांचे खूप हाल झाले. यातच आजारी पडून जुंगचे वडील वारले. 

पुस्तकाचा तिसरा आणि शेवटचा भाग हे जुंगचे आत्मकथन आहे. चीन मध्ये सांस्कृतिक क्रांती झाली तेंव्हा जुंग चौदा वर्ष ची होती. ती आपण होऊन रेड गार्ड (red gaurd) झाली. सुरवातीस ठीक होते पण नंतर त्यांच्या कामातील हिंसा वाढत गेली आणि जे काही चालत होते त्यातील दोष जुंगला जाणवू लागले. त्याच काळात माओच्या मतांना विरोध केल्या मुळे  तिच्या वडिलांचा उघड उघड छळ  सुरु झाला आणि मग जंग आणि तिच्या घरच्यांचे खूप हाल झाले.  सांस्कृतिक क्रांती संपल्यावर मात्र ती घरी आली आणि पुढे अतिशय कठीण अश्या स्पर्धेनंतर तिला इंग्लंडला शिकायला शिष्यवृत्ती मिळाली. त्याच दरम्यान माओचा मृत्यू झाला. तेंव्हा आपण उल्हासित झालो होतो असे तिने नमूद केले आहे.

 विसाव्या शतकात चीन मध्ये स्त्रियांचे आयुष्य किती खडतर होते ते पदोपदी/ प्रत्येक पानागणिक  जाणवते. तिन्ही पिढ्यांनी आपापल्यापरीने अतिशय क्रूर हिंसा जवळून बघितली. अशे बरेच प्रसंग आहे जे खरे असतील या वर विश्वास बसत नाही. दशलक्ष हून अधिक कुटुंबे आधी कम्युनिस्ट क्रांती आणि नंतर सांस्कृतिक क्रांतीत ओढली गेली. आदर्श व्यवस्थेची स्वप्ने बघत शेवट मात्र खूप वाईट झाला. प्रत्येक घराला त्याची झाल बसली.

ज्याला चीन बद्दल उत्सुकता असेल त्याने हे पुस्तक जरूर वाचावे. परमेश्वराने किंवा नियतीने आपल्यावर खूप अन्याय केला आहे असे वाटत असेल तरी हे वाचावे. म्हणजे आपण किती बऱ्या परिस्तितित आहोत हे समजेल.
  

No comments:

Post a Comment