Monday 6 January 2014

Lark Rise to Candleford (लार्क रायस टू कॅण्डलफोर्ड)

 माझ्या अनेक छंदापैकी एक म्हणजे क्लासिक इंग्लिश लिटरेचर बुक्स (classic english literature books) वाचणे आणि त्यांवर आधारित बी.बी.सी. (BBC) चे सिरिअल बघणे. त्यातली भाषा, शब्द, उच्चार आणि विनोद मला भुरळ पाडतात.  तो काळ दाखवायला तयार केलेले सेट आणि पोशाख, त्यांची आपलीच एक जादू असते. मला तर अगदी भारावून गेल्या सारखे होते. साधी गोष्ट आणि उत्कृष्ट अभिनय. काही पुस्तके जशी परत परत वाचण्यात मजा येते तसेच काही सिरिअलचे एपिसोड परत बघण्यात खूप मजा येते.  

सध्या मी बघत असलेले सिरिअल म्हणजे Lark Rise to Candleford. लेखिका फ्लोरा थॉम्पसन लिखित ३ कादंबरीवर आधारित ही कथा आहे. या कादंबऱ्या म्हणजे इंग्लंडच्या ग्रामीण पार्श्वभूमीतील तिचे semi autobiographical novels होय. पुस्तके प्रसिद्धीचा काळ होता १९३९ ते १९४३ दरम्यानचा. 

ही कथा इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड या काउंटी मधील एक वाडीवजा गाव (इंग्रजीशब्द hamlet), नाव Lark Rise  आणि त्याच्या शेजारील बाजारपेठ असलेले गाव (market  town ) Candleford परिसरात  साधारण १९साव्या  शतकाच्या शेवटी शेवटी घडते. ती इथल्या वेगवेगळा लोकांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीवर आधारित आहे. या मालिकेतून गावांत राहणारे शेतकरी, विविध कारागीर आणि पांढरपेशा वर्गातील लोक दिसतात. त्यांच्या मधील प्रेम, स्पर्धा, चढाओढ, मैत्री आणि शेजारधर्म याचा प्रत्यय येतो. सहसा कुठे हि अतिरेक नाही. तसे बघितले तर माणसाच्या आयुष्यात अतिरेक खूप कमी असतो, तो असतो बहुत करून, सिनेमा नाहीतर टीव्ही मालिकात. 

मालिकेच्या केंद्र स्थानी आहे एक तरुण मुलगी Laura Timmins, तिला नुकतीच एक बहिण झाली आहे, आई वडिलांचे पाचवे आपत्य. त्यामुळे घरात जागेची कमतरता भासते आणि सोय म्हणून तिची आई तिला आपल्या एका बहिणी (cousin ) कडे शेजारी गावी Candleford ला पाठवते.  ती बहिण म्हणजे Dorcas Lane, Candleford चे पोस्ट ऑफीस चालवत असते आणि ती Laura ला मदतनीस म्हणून आपल्याकडे ठेवते.  या दोन व्यक्तिरेखा आणि पोस्ट ऑफीसच्या आधारे आपल्याला परिसर आणि त्यातील लोक दिसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुखः असते. त्याची प्रभावी मांडणी, छोट्या गोष्टीतून, वाक्यातून, अभिनयातून आपणास दिसते. त्याकाळातला इंग्लंड मधला कामगारवर्ग, शिक्षणाच्या जोरावर परिस्थिती बदलण्याचे त्यांचे प्रयत्न, छान चित्रित केले आहे. रोजच्या जीवनातील प्रसंग, खरे वाटतात. 

ही मालिका जानेवारी २००८ ला सुरु झाली होती. यात एकूण ४ पर्व होते. पहिल्या पर्वात १० भाग होते, दुसऱ्यात १२, तिसऱ्यात  १२ आणि चौथ्या पर्वात ६ भाग होते. फेब्रुवारी २०११ ला ही मालिका संपली. 

भारतीय टीव्ही मालिका एका चाकोरीच्या बाहेर निघण्याचे फारसे प्रयत्न करत नाही, सासू सून, हेवे दावे, खोटे नाटे, विवाहबाह्य संबंध आणि अनेक अश्या बेसूर गोष्टींची बजबजपुरी. आपल्याकडे ही साहित्य  खूप आहे पण वेगळ्या धाटणीच्या प्रयोगासाठी जे रसायन लागते, त्याची उणीव भासते. 

Lark Rise to Candleford ही मालिका सध्यातरी youtube वर उपलब्ध आहे  आणि पुस्तके नगरवाचनालयात नक्कीच उपलब्ध असणार.

तुम्ही जर मालिका बघितली किंवा पुस्तके वाचलीत तर कशी वाटली ते सांगा. 

No comments:

Post a Comment