Tuesday, 4 March 2014

माझे e - पुराण ब्लॉग ची नवीन लिंक


काही कारणास्तव हा ब्लॉग नवीन जागी  हलवत आहे. 

या ब्लॉग ची नवीन लिंक

माझे e - पुराण


Saturday, 1 March 2014

अविश्वसनीय!

आपल्याकडील गरिबी, अस्वच्छता आणि इतर दोषांबद्दल पाश्चात्य मिडियातून आणि विविध ब्लॉग मधून लिखाण होत असते. पण काही वेळा अश्या "अविश्वसनीय " बातम्या, इतर देशांतील सावळ्या गोंधळावर प्रकाश टाकतात.

गेल्या आठवड्यात इंग्लंड मध्ये केंट येथे एक भला मोठा व्हेल माशा समुद्र किनारी मेलेला आढळला. त्याचे धड पाच दिवस तसेच समुद्र किनारी पडून कुजत होते. शेवटी स्थानिक प्रशासनाने त्याला हलवले. आश्चर्य म्हणजे तोंड व शेपूट काढलेले व्हेलचे धड एका उघड्या ट्रक मधून नेहण्यात आले. ते नेताना प्रचंड दुर्गंधी पसरली होती तसेच रक्त व इतर सांडत होते. शेजारिल चित्र भलतेच बोलके आहे. 

 पूर्ण बातमी येथे सापडेल "Smell of rotting whale on truck 'unbelievable'". 

Sunday, 23 February 2014

वीकेंड स्पेशल!

शनिवार - रविवार साठी राखीव कार्यक्रम म्हणजे अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांचे वाचन किंवा चाळण. रोज तसे ठराविक वृत्तपत्रे चाळली जातात. वाचण्या सारखे बहुतांश वेळी काही नसते. असो.

आज रविवार २३ फेब्रुवारी रोजी, मला म.टा (महाराष्ट्र टाईम्स ) मधील हे दोन लेख आवडले, पटले.

  1. सोशल मीडिया नव्हे, राजकारण बदला  … ए भाई जरा देख के चलो- काय खरे काय खोटे ...

Sunday, 16 February 2014

निमित्त - विद्यावंतांची बधिरता!

मागिल काही आठवडे व्यवसाय आणि फिरती या मुळे ब्लॉग लिखाण होऊ शकले नाही. आज मात्र ते शक्य होईल असे वाटत आहे. एक प्रयत्न, आधार लोकसत्तेतील लेख

   " …  शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम एका परदेशी कंपनीला देण्यासाठीच शहरात कचऱ्याचा प्रश्न निर्माण करण्यात आल्याचा संशय खासगी चर्चेत व्यक्त होत आहे. एका परदेशी कंपनीला काम देण्यासाठीच गेले महिनाभर शहरातील कचऱ्याचा प्रश्न चर्चेत ठेवण्यात आला होता, …"  



पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न या विषया वरील लेख आहे. दुर्दैव आहे कि कचरा आमचा पण त्याची काळजी/विल्हेवाट लावायला आम्हाला जमत नाही. यात दोष कुणाचा आहे?  हे विचार करायला देखील आम्हाला वेळ आहे का?
 
ही बातमी वाचल्या वर मला दुर्गाबाई भागवत यांच्या व्यासपर्व या पुस्तकातील भाग आठवला
"विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला मोठा शाप आहे. बुद्धिवंतांची संवेदनक्षमता करवंडली की मग पाशवी बलाचाच आग्रह अनावर होतो. स्वत्;ची कीव करत भले भले बसतात आणि मग चळवळे, दुय्यम दर्जाचे लोक सामर्थ्याची सारी क्षेत्रे काबीज करतात. पण ती त्यांनाही फार काळ पेलत नाहीत. जागा मोठ्या माणसे लहान - असे उलटे गणित सुरू होते. हे उलट्या गणिताचे चक्र द्रोणाने युगापूर्वी फिरवले. अजून ते तसेच फिरते आहे."

हे येथे हि लागू पडते, कसे? पुण्यात किंवा विचारांचा आवाका वाढवू, महाराष्ट्रात  एक आय आय टी,  अनेक नामवंत  इंजीनियरिंग कॉलेज, एग्रिकल्चर कॉलेज, विज्ञाननिष्ट विद्यापीठे आणि अनेक संशोधन संस्था आहेत, त्यातील national chemical laboratory, खुद्द पुण्यातच आहे.  या सर्व संस्था मधून महत्वाच्या  विषयांवर संशोधन चालते. यातील अनेक संस्था आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आहेत.

रोज निर्माण होणारा कचरा, हा इतका शुल्लक विषय आहे का कि अजून कोणी या बाबतीत पुढाकार  नाही घेत आहे? ( अनेक पालिका आणि महापालिकांचा कचरा व्यस्थापन या विषया वरील बातम्या आता नियमित पेपर मध्ये येतात तेंव्हा हा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे ).   कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया या आशयाच्या प्रकल्प वर काम करण्यात कमी पण येतो का? त्याला अनुदान मिळत नाही का?  अनुदान देणाऱ्या संस्थांना यातील गांभीर्य जाणवत नाही का? मोठ्या संस्था मधून चालणारे संशोधन समाजाभिमुख नको का?

पेपरात जेंव्हा आंतर  शालेय, विभागीय विज्ञान प्रदर्शन ची माहिती असते, तेंव्हा एक तरी प्रकल्प कचरा व्यवस्थापन/प्रक्रिया  वर असतो. जेंव्हा लहान प्रमाणावर हे प्रकल्प होऊ शकतात मग पुढे कां  नाही. बालवयात केलेले संशोधन हे निव्वळ  time pass म्हणून असतात का?

सर्व सामान्य नागरिक यात कश्या प्रकारे मदत करु शकतात? तर घरीच कचऱ्याचे वर्गीकरण करून. जेणे करून ओला आणि सुका कचरा वेगळा होऊ शकतो. परत सुक्या कचऱ्यात ही वर्गीकरण करता येते, उदाहरणार्थ  कागद, प्लास्टिक, रासायनिक (निरुपयोगी सेल (battery) )  आणि इतर. 

शेवटी एकच सांगायचे आहे आपण विद्यावंत असो किंवा सामान्य नागरिक, आपण या समाजाचे देणे लागतो तेंव्हा प्रत्येकाने समाजाचे कल्याण होईल याच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. माणूस जितका जास्त विद्यावंत त्याची जवाबदारी तेवढीच जास्त. ती टाळणे म्हणजे  मिळालेल्या ज्ञानाचा अपमानच करणे.

Friday, 31 January 2014

Wild Swans: Three Daughters of China


पुस्तक माहिती :
मी परीक्षण असे नाही म्हणणार कारण मी स्वतः तेवढ्या ताकदीची लेखिका नाही.

 हे पुस्तक विसाव्या शतकातील चीन मधील एका घराण्यातील तीन पिढ्यांची (खरे तर तीन पिढ्यांच्या स्त्रियांची ) कथा आहे.   Jung Chang (जुंग चांग) ही पुस्तकाची लेखिका असून, पुस्तकात एकूण तीन भाग आहे,  प्रथम आजी, मग आईची कथा आणि शेवटी  Jung चे आत्मकथन. 

एका British university तून  डॉक्टरेट (PhD) मिळवलेली पहिली चिनी व्यक्ती म्हणजे Jung Chang. १९७८ साली ती सरकारी शिष्यवृत्ती मिळवून इंग्लंडला गेली आणि अनेक टप्पे पार करत १९८२ मध्ये भाषा विषयात यॉर्क विद्यापीठातून डॉक्टरेट हि पदवी संपादन केली. जुंग चांगची बरीच पुस्तके प्रसिद्ध झालीत. त्यात सर्वात गाजलेले पुस्तक म्हणजेच "Wild Swans: Three Daughters of China".  पुस्तक १९९१ साली प्रथम प्रसिद्ध झालं. या पुस्तकाचा ३७ भाषण मध्ये अनुवाद झाला आहे आणि कोटी हून अधिक पुस्तके विकली गेली आहेत. हल्लीच मराठी अनुवाद झाल्याचे वाचनात आले होते. 

पुस्तकाची सुरुवात  जुंगच्या आजीच्या कथे पासून होते. आजीचा जन्म एका गरीब घरात झाला होता. आजीचे वडील तिचे लग्न लावण्यापेक्षा त्या काळातील पद्धती प्रमाणे तिला एका मोठ्या लष्कर अधिकारयाची नावाची बायको म्हणून देतात (थोडक्यात विकतात), प्रत्क्षात त्या लष्कर अधिकाऱ्याला एक बायको आणि अनेक ठेवलेल्या बायका असतात. त्यात जुंगच्या आजीची भर पडते.  पण या संबंधामुळे  आजीच्या वडिलांचे समाजातील स्थान बळकावते. त्यावेळी मात्र अतिशय तरुण अश्या आजीची अवस्था फार कठीण असते.  तिला राहायला तिच्यात गावात मोठे घर आणि सुखसुविधा असतात पण तेवढ्याच अटीपण असतात. त्यातली एक अट अशी कि ती स्वतःच्या आई वडील यांना देखील भेटू शकत नव्हती.

त्या तथाकथित लग्नानंतर ७ वर्षाने जुंगच्या आईचा जन्म झाला. अनेक चित्र - विचित्र घडामोडी नंतर मात्र सुदैवाने वयाच्या २४व्या वर्षी तिची आजीची त्या लष्करी अधिकाऱ्याच्या पाशातून  सुटका होते. ती परत आपल्या आई वडिलांकडे येते पण तेथे हि सर्व आलबेल असते कारण तिचे वडील तो पर्यंत एक बाई घरात आणतात आणि तिला ते सर्व हक्क देतात. ज्यामुळे  जुंगची आजी आणि तिची आई हवालदिल होतात. काही काळाने जुंगची आजी पुन्हा लग्न करते, या वेळीस खरे लग्न होते पण तिचा नवरा तिच्या हून वयाने खूप मोठा असतो.  आजीचा हा नवरा एक प्रतिष्ठित घराण्यातील असून डॉक्टर होता. त्याची मुले जुंगच्या आजीपेक्षा वयाने मोठी होती आणि त्यांना वडिलांचे हे लग्न मान्य नव्हते. तेंव्हा तो डॉक्टर आपले राहते घर आणि संपत्ती मुलांच्या स्वाधीन करून, आपल्या नवीन पत्नी आणि तिच्या मुलीला घेवून  दुसऱ्या गावी निघून जातो. ते दोघे नवीन गावी संसार थाटतात आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी पण होतात.  जुंगच्या आई ला तिच्या आई आणि सावत्र वडिलां कडून खूप प्रेम मिळते.

पुस्तकाचा दुसरा भाग जुंगच्या आई  (Bao Qin/De-hong) विषयी आहे.   वयाच्या पंधराव्या वर्षी जुंगची आई कम्युनिस्ट पार्टीची आणि माओच्या रेड आर्मीची कार्यकर्ती झाली. आपल्या कामात ती अतिशय प्रामाणिक  होती आणि एक आदर्श कार्यकर्ता म्हणून तिची ओळख होती. त्या मुळे  पार्टीत तिची प्रगती होऊन तिचा ओहदा वाढत गेला. पार्टीसाठी काम करत असताना तिची भेट जुंगच्या वडिलांशी झाली आणि त्यांनी लग्न केले. कम्युनिस्ट पार्टीतील वरिष्ठ अधिकारी असल्याने सुरवातीची काही वर्षे त्यांना विशेष सुविधा मिळत होत्या. पुढे काही गोष्टी मुळे, विशेष करून माओच्या धोरणांना विरोध केल्यामुळे ते दोघे दोषी ठरवले गेले आणि मग मात्र त्यांचे खूप हाल झाले. यातच आजारी पडून जुंगचे वडील वारले. 

पुस्तकाचा तिसरा आणि शेवटचा भाग हे जुंगचे आत्मकथन आहे. चीन मध्ये सांस्कृतिक क्रांती झाली तेंव्हा जुंग चौदा वर्ष ची होती. ती आपण होऊन रेड गार्ड (red gaurd) झाली. सुरवातीस ठीक होते पण नंतर त्यांच्या कामातील हिंसा वाढत गेली आणि जे काही चालत होते त्यातील दोष जुंगला जाणवू लागले. त्याच काळात माओच्या मतांना विरोध केल्या मुळे  तिच्या वडिलांचा उघड उघड छळ  सुरु झाला आणि मग जंग आणि तिच्या घरच्यांचे खूप हाल झाले.  सांस्कृतिक क्रांती संपल्यावर मात्र ती घरी आली आणि पुढे अतिशय कठीण अश्या स्पर्धेनंतर तिला इंग्लंडला शिकायला शिष्यवृत्ती मिळाली. त्याच दरम्यान माओचा मृत्यू झाला. तेंव्हा आपण उल्हासित झालो होतो असे तिने नमूद केले आहे.

 विसाव्या शतकात चीन मध्ये स्त्रियांचे आयुष्य किती खडतर होते ते पदोपदी/ प्रत्येक पानागणिक  जाणवते. तिन्ही पिढ्यांनी आपापल्यापरीने अतिशय क्रूर हिंसा जवळून बघितली. अशे बरेच प्रसंग आहे जे खरे असतील या वर विश्वास बसत नाही. दशलक्ष हून अधिक कुटुंबे आधी कम्युनिस्ट क्रांती आणि नंतर सांस्कृतिक क्रांतीत ओढली गेली. आदर्श व्यवस्थेची स्वप्ने बघत शेवट मात्र खूप वाईट झाला. प्रत्येक घराला त्याची झाल बसली.

ज्याला चीन बद्दल उत्सुकता असेल त्याने हे पुस्तक जरूर वाचावे. परमेश्वराने किंवा नियतीने आपल्यावर खूप अन्याय केला आहे असे वाटत असेल तरी हे वाचावे. म्हणजे आपण किती बऱ्या परिस्तितित आहोत हे समजेल.
  

Monday, 13 January 2014

भारताचा अर्वाचीन इतिहास - सिंधूनदी संस्कृती (भाग 2)


भारताचा अर्वाचीन इतिहास :- सिंधूनदी संस्कृती 

इतिहासात आपण वसाहती बद्दल वाचतो, पण मानवी इतिहाचाची सुरुवात खूप वेगळ्या रीतिने  झाली.
माणूस अस्तित्वात आला तेंव्हा पाणी व हवा उपलब्ध होतीच आणि इतर प्राण्यां प्रमाणे गरज लागली की तो अन्नाचा शोध घेत असे. बुद्धी असल्याने तो नंतर मात्र उपलब्ध अन्न साठवू लागला. पुढे आगीचा शोध लागला आणि  कालांतराने त्याने शिकारीसाठी आयुधे ही तयार केलीत. सुरुवात दगडा पासून झाली, मग दगड आणि लाकूड, आणि शेवटी धातू. असे करून तो हळू हळू स्थिरावला आणि वसाहत करू लागला.

संस्कृती किंवा सभ्यता म्हणजे काय? क्लिष्ट व्याख्येत न जाता, संस्कृतीसाठी लागणाऱ्या किमान गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगायच्या तर पुढील  प्रमाणे आहेत : मोठी केंद्रीय वसाहत, अतिरिक्त अन्न साठा, वसाहतीचा कारभार बघण्यास शासन, धार्मिक ऐक्य, कामाची विभागणी आणि आर्थिक व्यवहाराची सोय किंवा कर प्रणाली. हे आणि इतर काही मुद्दे प्रमाण मानून संस्कृतीचा अभ्यास केला जातो. 

भारतात अश्मयुगा पासून ते समृद्ध वसाहती, या कालखंडात  झालेल्या प्रगतीचा कालक्रमानुसार तंतोतंत इतिहास लिहिणे पुरातत्व विज्ञानच्या (पुराणवस्तुसंशोधन) आधुनिक अभ्यासानंतर देखील अजूनही शक्य नाही. 

सानेगुरुजी म्हणतात " प्राचीन काळी चीनमधून, पश्चिम व मध्य आशियातून मोठमोठे प्रवासी येऊन त्यांनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी फिरून आपली प्रवासवृत्ते लिहून ठेवली आहेत.  त्यांच्या वाचनातच मनाने मी सारा देश पाहिला. " आणि "पाच हजार वर्षांच्या इतिहासात किती स्वार्‍या, किती उत्पात झाले.  परंतु सांस्कृतिक परंपरा सदैव टिकून राहिली. 

सिंधूनदी संस्कृतीत ज्या दोन मुख्य शहरांचा शोध लागला ते म्हणजे हरप्पा आणि मोहोंजो दारो त्या वरून ही संस्कृती नागरी—मोठ्या शहरांतून केंद्रित झालेली होती. दोन्ही शहरांची बांधणी एकाच पद्धतीची आणि नगर रचन अतिशय उत्तम होती.  उत्खननात सापडलेल्या अवशेषां  वरून मूळ शहरांचे  क्षेत्र अंदाजे एक चौ. मैल असणर.  अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत  हरप्पात एका भिंतीचा काही भाग शिल्लक होता पण तो मध्ययुगात बांधण्यात आला असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे.  मोहोंजो दारो येथे ही एका बंधाऱ्याचे (भिंती)चे अवशेष सापडले आहेत पण ते मूळचे असावे. घरे मोठी होती आणि एकाहून जास्त मजले असलेल्या घरांच्या भिंती भक्कम होत्या. ह्या घरांसाठी छताला आधार देण्यासाठी ठोस मजबूत असे लाकूड वापरण्यात यायचे जे बहुत करून पार हिमालयातून आणले जायचे. मोठ्या घरांचे अंगण फरसबंदी असायचे, अश्या घरांत एक विहिर सुद्धा असायची.  या शहरांचे सर्वात मोठे वैशिष्ट होते, अतिशय उत्कृष्ट अशी सांडपाणी विल्हेवाट लावायची व्यवस्था. नदीच्या पुरामुळे ही शहरे अनेकदा वसवली गेली, घरांची रचना बदलण्यात आली मात्र रस्ते आणि गटार व्यवस्था चोख आणि पूर्वीचीच होती. तसेच रस्ते पूर्वी ठरवलेल्या प्रमाणेच होतेआणि वसाहतीच्या काळात त्यावर अतिक्रमण झाले नाही त्यामुळे लोक नगररचनेतील नियम पळत असावे. शास्त्रज्ञांच्या मते हे इतर संस्कृती, मेसोपोटामिया, ग्रीक किंवा रोमच्या अगदी विरुद्ध होते. या वसाहतींच्या होण्याबद्दलचे सर्व पुरावे ठोस आहेत, इतकी हजारवर्षे भंगलेल्या अवस्थेत असले तरी सर्व बांधकाम व्यवस्थित होते, बदल आंतरिक होते जे कदाचित अचानक झालेल्या परदेशी आक्रमण आणि त्याने उद्भवलेल्या हत्याकांडामुळे  झाले असावे कारण बऱ्याच घरात आणि रस्त्यां वर अनेक मानवी सांगाडे मिळाले होते. अवशेषां वरून हि संस्कृती नवीन नव्हती आणि खूप प्रगत झाली होती.  सोने-चांदीचे आभूषण, तांबे-पितळची अवजारे, चाकावर तयार केलेली मातीची सुबक भांडी, कापड तयार करून रंगवणे या सर्व कला अवगत होत्या. धान्यात सातू, गहू, तांदूळ,  आणि तेलबी साठी तीळ वापरले जात होते. प्राणी पाळणे रूढ झाले होते. लेखनकला अवगत होती. मिळालेल्या मुद्रा वर अशक्य कोटीतील प्राणी आहेत किंवा अनेक प्राण्यांचे संयुग, जसे हत्ती, मेंढा, वाघ, मासा, म्हैस. एका मुद्रेवर कोरलेले चित्र अर्धे पुरुष आणि अर्धे सिंह चे आहे, जे पुढे जाऊन  'नरसिंह' म्हणून ओळखले गेले असावे.  व्यापाराच्या बाबतीत निसंदेह खूप प्रगती झाली होती. चलनाचे स्वरूप जरी नाही समजले तरी वजनासाठी प्रमाण होते हे समजते. वजन मोजमापासाठी मूलभूत अशी प्रणाली होती. काही वजन माप तर इतके लहान आहे कि ते बहुदा सोने-चांदी, रत्न माणिक किंवा अति मौल्यवान वस्तू वजन करण्यास वापरात असावे. सिंधू घाटी संस्कृती एका क्षेत्रात सीमित होती, एकवटलेली होती, ती गंगेच्या खोऱ्या पर्यंत विस्तारित नव्हती.  त्याकाळातील लिपी हि अशोकाच्या ब्राम्ही लिपीशी साधर्म  असण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या लेखांचा अद्याप पूर्ण उलगडा झालेला नाही. 

नदी खोऱ्यातील संस्कृतीचे मूळ कारण म्हणजे पाण्याचा पुरवठा आणि शेतीसाठी मोकळी जागा.  त्याकाळात मोठ मोठाली जंगले साफ करणे तसे शक्य नव्हते.  सिंधू नदीला प्रचंड पूर येतात आणि पूर्वी या हून मोठे येत असावे आणि त्या मुळे  डोंगर माथ्यावरील जंगले आपोआप नष्ट होऊन  शेती साठी जागा उपलब्ध होत असावी. मोहेंजो-दारोचे अवशेष पाहिले तर वाळूचे थरावर थर बसत गेलेले दिसतात, व त्यामुळे घरांच्या जुन्या पायावर उंचउंच तळ घेत घरे बांधणे भाग झालेले दिसते परंतु तळाच्या चढत्या उंचीमुळे उत्तरोत्तर भिंती अधिक उंच कराव्या लागत होत्या.

मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथील उत्खननावरून कितीतरी गोष्टी शेकडो वर्षे गेली तरी कशा टिकून राहिल्या आहेत हे दिसते.  खणून काढलेली काही काही घरे तर चांगली दुमजली, तिमजली होती याचे पुरावे सापडले आहेत. हे सर्व असून, अतिरिक्त धान्य साठे मात्र मेसापोटेमियातील किंवा नीलनदी संस्कृतीच्या  साठ्यांन पेक्षा लहान होते.
सापडलेल्या अवशेषां वरून सिंधूनदी संस्कृती ही मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथे एकवटलेली होती. या भागात ज्या दुसऱ्या वस्त्या सापडल्या त्यतील सर्वात मोठे गाव खैरपूर' येथे  ९०० मैल लांब उत्तरेला होते. त्या भागात विकास फार झाल्याचे आढळले नाही.  तसेच लोथल, बदीन, कच्छ च्या वाळवंटात काही ठिकाणी व्यापार नाके किंवा छोट्या वसाहती सदृश अवशेष सापडलेत ह्या वरून सिंधू घाटीतील लोकांचा तत्कालीन संस्कृतीशी व्यावसायिक संपर्क होता. 
सिंधू नदी संस्कृतीतील दफनभूमी ही पण अभ्यासाचा विषय आहे. हरप्पा येथील एका दफनभूमीला cemetry H असे नाव आहे. तिचे वैशिष्ट म्हणजे लहान मुलांनचे सांगाडे माठाच्या आकाराच्या भांड्यात सापडले आहे, मृत मुलांना गोल अश्या मातीच्या भांड्यात दफन करण्यात येत असावे, जणू पुन्हां गर्भाशयात ठेवल्या सारखे. हे सांगाडे पूर्ण होते याच्या उलट मोठ्या व्यक्तींची काही हाडे मठात सापडली आहेत. काही भांड्यान वर नक्षीकाम केलेले आढळते. पुरण्याच्या पद्धतीत मूलगामी बदल जाणवतो. याचे कारण बाहेरून हल्लेखोर आले असावे,  ज्या मुळे  युद्ध आणि मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. पण कुठल्या हि गोष्टी चा नित सुगावा लागत नाही.

सिंधूनदी संस्कृतचा नाश कसा झाला? संस्कृती कशी गडप झाली? एके काळी जिथे शेती होत असे तिथे वाळवंट कसे आले?याच्या संबंधी लिखाण सापडत नाही. प्राचीन शहरे वाळूत पुरली गेली पण काही प्रमाणात वास्तूंचे जतन झाले. कुणी सांगावे भविष्यात पुरातत्व (पुराणवस्तुसंशोधन) खात्याला अजून काही अवशेष सापडतील आणि अधिक माहिती उपलब्ध होईल. 

विशेष 
मेसोपोटेमिया येथील पुरातन वास्तू  मध्ये ७ मुख्य शहरे आढळतात, या गावांच्या द्वारपाल (guardian  figures ) वरून पुढे सात-ऋषी आख्यिका प्रसिद्द झाली. सिंधूनदी संस्कृतीतील दोन मुद्रां वर कदाचित याच सात द्वारपालांचे चिन्ह प्रतिबिंबित होते असा अंदाज आहे आणि कदाचित ब्राह्मणातील गोत्र प्रणालीतील ते सात ऋषी असावे. पण ऋषी कुळाची ही संख्या आणि प्रचिलित संख्येत तफावत आहे. 
NOTE: या संदर्भात अजून माहिती मिळवणे गरजेचे आहे. वाचकांपैकी कोणास माहिती असल्यास कळवावे. 

Monday, 6 January 2014

Lark Rise to Candleford (लार्क रायस टू कॅण्डलफोर्ड)

 माझ्या अनेक छंदापैकी एक म्हणजे क्लासिक इंग्लिश लिटरेचर बुक्स (classic english literature books) वाचणे आणि त्यांवर आधारित बी.बी.सी. (BBC) चे सिरिअल बघणे. त्यातली भाषा, शब्द, उच्चार आणि विनोद मला भुरळ पाडतात.  तो काळ दाखवायला तयार केलेले सेट आणि पोशाख, त्यांची आपलीच एक जादू असते. मला तर अगदी भारावून गेल्या सारखे होते. साधी गोष्ट आणि उत्कृष्ट अभिनय. काही पुस्तके जशी परत परत वाचण्यात मजा येते तसेच काही सिरिअलचे एपिसोड परत बघण्यात खूप मजा येते.  

सध्या मी बघत असलेले सिरिअल म्हणजे Lark Rise to Candleford. लेखिका फ्लोरा थॉम्पसन लिखित ३ कादंबरीवर आधारित ही कथा आहे. या कादंबऱ्या म्हणजे इंग्लंडच्या ग्रामीण पार्श्वभूमीतील तिचे semi autobiographical novels होय. पुस्तके प्रसिद्धीचा काळ होता १९३९ ते १९४३ दरम्यानचा. 

ही कथा इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड या काउंटी मधील एक वाडीवजा गाव (इंग्रजीशब्द hamlet), नाव Lark Rise  आणि त्याच्या शेजारील बाजारपेठ असलेले गाव (market  town ) Candleford परिसरात  साधारण १९साव्या  शतकाच्या शेवटी शेवटी घडते. ती इथल्या वेगवेगळा लोकांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीवर आधारित आहे. या मालिकेतून गावांत राहणारे शेतकरी, विविध कारागीर आणि पांढरपेशा वर्गातील लोक दिसतात. त्यांच्या मधील प्रेम, स्पर्धा, चढाओढ, मैत्री आणि शेजारधर्म याचा प्रत्यय येतो. सहसा कुठे हि अतिरेक नाही. तसे बघितले तर माणसाच्या आयुष्यात अतिरेक खूप कमी असतो, तो असतो बहुत करून, सिनेमा नाहीतर टीव्ही मालिकात. 

मालिकेच्या केंद्र स्थानी आहे एक तरुण मुलगी Laura Timmins, तिला नुकतीच एक बहिण झाली आहे, आई वडिलांचे पाचवे आपत्य. त्यामुळे घरात जागेची कमतरता भासते आणि सोय म्हणून तिची आई तिला आपल्या एका बहिणी (cousin ) कडे शेजारी गावी Candleford ला पाठवते.  ती बहिण म्हणजे Dorcas Lane, Candleford चे पोस्ट ऑफीस चालवत असते आणि ती Laura ला मदतनीस म्हणून आपल्याकडे ठेवते.  या दोन व्यक्तिरेखा आणि पोस्ट ऑफीसच्या आधारे आपल्याला परिसर आणि त्यातील लोक दिसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुखः असते. त्याची प्रभावी मांडणी, छोट्या गोष्टीतून, वाक्यातून, अभिनयातून आपणास दिसते. त्याकाळातला इंग्लंड मधला कामगारवर्ग, शिक्षणाच्या जोरावर परिस्थिती बदलण्याचे त्यांचे प्रयत्न, छान चित्रित केले आहे. रोजच्या जीवनातील प्रसंग, खरे वाटतात. 

ही मालिका जानेवारी २००८ ला सुरु झाली होती. यात एकूण ४ पर्व होते. पहिल्या पर्वात १० भाग होते, दुसऱ्यात १२, तिसऱ्यात  १२ आणि चौथ्या पर्वात ६ भाग होते. फेब्रुवारी २०११ ला ही मालिका संपली. 

भारतीय टीव्ही मालिका एका चाकोरीच्या बाहेर निघण्याचे फारसे प्रयत्न करत नाही, सासू सून, हेवे दावे, खोटे नाटे, विवाहबाह्य संबंध आणि अनेक अश्या बेसूर गोष्टींची बजबजपुरी. आपल्याकडे ही साहित्य  खूप आहे पण वेगळ्या धाटणीच्या प्रयोगासाठी जे रसायन लागते, त्याची उणीव भासते. 

Lark Rise to Candleford ही मालिका सध्यातरी youtube वर उपलब्ध आहे  आणि पुस्तके नगरवाचनालयात नक्कीच उपलब्ध असणार.

तुम्ही जर मालिका बघितली किंवा पुस्तके वाचलीत तर कशी वाटली ते सांगा.